CNG-PNG Price Hike: सीएनजी, पीएनजी दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या मुंबईत कितीने वाढल्या किमती
Image used for representational purpose | (Photo Credit: PTI)

सीएनजी(CNG), पीएनजी (PNG) आणि एलपीजी (LPG) दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ (CNG-PNG Price Hike) झाली आहे. महत्त्वाचे असे की, ही वाढ केवळ 22 दिवसांमध्ये झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मुंबई (Mumbai) आणि आसपासच्या परिसरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची वितरण किंमत प्रति किलो 2 रुपयांनी वाढवली आहे. याव्यतिरिक्त एलपीजी पीएनजीच्या दरातही प्रति किलो दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीत करांचा समावेश असला तरी दरवाढ ही अंतिमत: ग्राहकांच्या खिशावरच भार टाकणारी आहे.

मुंबई शहर, उपनगरातील नवे गॅसदर

सीएनजी- 63.50 रुपये (प्रतिकिलो)

पीएनजी- 38 रुपये (प्रति युनिट)

वाढीव दरांमुळे मुंबईतील पाइप नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजी 38 रुपये प्रति युनिटवर पोहोचला आहे. तर सीएनजी दरबाात सांगायचे तर हा दरही 63.50 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. मुंबई महानगर आणि उपनगरांमध्ये पाठिमागील 11 महिन्यांमध्ये सीएनजी दर एकदोन नव्हे तर तब्बल 16 रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम महानगरातील आठ लाख ग्राहकांवर होतो आहे. (हेही वाचा, Mumbai Fraud: मुंबईमध्ये एलपीजी गॅस कंपनीचा ग्राहक संबंध सहाय्यक असल्याचा दावा करत एका व्यक्तीची 2.06 लाखांची फसवणूक)

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस वाटपातील कमतरता पूर्ण करण्यासाठी, MGL, CNG आणि देशांतर्गत PNG विभागांची वाढती गरज भरुन काढण्यासाठी अतिरिक्त बाजार-किंमत नैसर्गिक वायू आयातीत (RLNG) मिळवत आहे. आयात दरांमध्ये RLNG च्या किमतीत भरीव वाढ झाल्यामुळे, MGL च्या इनपुट गॅसच्या किमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. गॅसच्या इनपुट खर्चातील वाढ अंशतः भरून काढण्यासाठी ही दरवाढ करावी लागल्याचा दावा MGL अधिकारी करतात.

दरम्यान, सीएनजी, पीएनजी आण एलपीजी दरांमध्ये वाढ झाली असली तरी पेट्रोल, डिझेल इंधन दर मात्र अद्याप तरी स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्पादनशुल्क कमी केल्यापासून अद्याप पर्यंत तरी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल दरांमध्ये वाढ केली नाही. त्यामुळे इंधन दर काहीसे स्थिर आहेत. केंद्रा प्रमाणेच काही राज्यांनीही जर इंधनावरील कर कमी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना किंचीतसा दिलासा मिळताना दिसतो आहे.