महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढत आहे. मुंबई, पुणे शहरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज सायंकाळी 8:30 वाजता राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन तसेच कठोर निर्बंधावर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची आकडेवारी जास्त असणाऱ्या जिल्ह्यात सध्या कडक निर्बंध तसेच अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री संपूर्ण राज्यातील रुग्ण संख्येचा विचार करता कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (वाचा - Pune COVID 19 Guidelines: 3 एप्रिल पासून हॉटेल, सिनेमागृह, बार, PMPML बस सेवा 7 दिवस पूर्णपणे बंद; संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी)
तुम्ही आज सायंकाळी साडेआठ वाजता https://facebook.com/CMOMaharashtra या लिंकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकू शकता.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज रात्री ८.३० वाजता राज्यातील जनतेला संबोधित करतील.
CM Uddhav Balasaheb Thackeray will address the state on 2nd April, 2021 at 8:30pm
Facebook: https://t.co/2xokOekMo2#Maharashtra
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 2, 2021
दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर दुपारी 4.30 वाजता राज्यातील वाढत्या कोरोना प्रकरणासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केलं आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राज्यातील कोरोना प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार आहे.
राज्यात लॉकडाऊन लागू करण्यास महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने विरोध केला आहे. तसेच विरोधी पक्ष भाजपकडूनदेखील लॉकडाऊनला विरोध होत आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात कोणता निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.