CM Eknath Shinde on Uddhav Tahckeray: देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याचा काय अधिकार? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना सवाल
CM Eknath Shinde, Uddhav Thackeray (PC - PTI)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्येच त्याग केला. केवळ सत्तेच्या लोभापायी ते सर्व काही विसरले. त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल आणि खुर्चीबद्दल बोलण्याचा अधिकारच काय? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. ते वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलत होते. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेबाबत विचारले असता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यावेळी नागपूर येथे शिवसेना (UBT) पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख त्यांनी नागपूरचा कलंक अशी केला. त्यावरुन भारतीय जनता पक्षात तीव्र नाराजी आहे. उद्धव ठाकरे यांच्या विधानाचा निषेध करत अनेक ठिकाणी भाजपने आंदोलने सुरु केली आहेत. दुसऱ्या बाजूला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे हेच मोठा कलंक आहेत. ते करंटा कलंक असल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या कलंक शब्दावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतू, उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दे आणि प्रश्नांबाबत मात्र भाजपने उत्तर देणे टाळले आहे. (हेही वाचा, BJP Protest On Abdul Sattar: 'अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्या', भाजप आक्रमक; CM एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भाजपने घेतलेल्या आक्रमक भूमिकेला त्याच शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा अनेक राजकीय नेते, त्यांचे कुटुंबीय यांच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करतो. त्यांना बदनाम करतो आणि पुढे त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो, त्यावेळी तो कलंक असत नाही का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

ट्विट

राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात भाजप-शिवसेना सरकार सत्तेत आले. मात्र, आता त्यातही अजित पवार यांच्या रुपात तिसरा भिडू आल्याने राज्यात शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्यात प्रचंड प्रमाणात अस्थिरताही पाहायला मिळते आहे.