भाजपसोबत आम्ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र आलो. हिंदुत्त्वामध्ये वचन पाळणे याला प्रचंड महत्त्व आहे आणि वचनच जर मोडलं जात असेल, तर ते हिंदुत्त्व (Hindutva) मानायला किंवा स्वीकारायला मी तयार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपला टोला लगावला आहे. राज्यात महाविकासआघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पहिल्यांदाच दीर्घ मुलाखत दिली. दै. सामना (Saamana) संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्ष केला.
या मुलाखती उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप यूतीत आलेला दुरावा, महाविकासआघाडी महाराष्ट्रात सत्तेवर येण्याचे कारण आणि यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिसेना भाजप यांच्यात चांगले चालले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला छोटा भाऊ तर, देवेंद्र फडणवीस हे आपल्याला मोठा भाऊ म्हणत होते. मग अचानक ही भाऊबंदकी का घडली. महाराष्ट्राला असं पाहायला का मिळालं? असं खा. संजय राऊत यांनी विचारले. (हेही वाचा, Union Budget 2020: सरकारकडे 'अर्थ' नाही पण, 'शब्दरत्न' बक्कळ; केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेनेचे टीकास्त्र)
संजय राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेना जन्माला आली. दरम्यान, हिंदुंवर गंडांतर येतंय असं जेव्हा शिवसेनाप्रमुखांच्या ध्यानात आलं तेव्हा त्यांनी हिंदुत्त्वाचा अंगीकार केला. त्यानंतर 1987 मध्ये मुंबई महापालिकेतील पहिली निवडणूक ही हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर लढली गेली. केवळ लढलीच गेली नाही तर, जिंकलीही गेली. त्यानंतर मग भाजप शिवसेनेकडे आला. मग त्यानंतर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एत्रत आले. त्यात आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, आजही आम्ही हिंदुत्त्वावर ठाम आहोत. आम्ही हिंदुत्त्वाचा मुद्दा सोडला नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, वाल्याचा वाल्मिकी करण्याची लॉण्ड्री केवळ भाजपकडेच आहे काय? असा सवाल विचारत पक्ष फोडून सत्ता मिळविण्यापेक्षा थेट पक्षाशी हातमिळवणी करुन सत्ता मिळवली तर त्यात गैर काय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच, आम्ही वाल्याचा वाल्मिकी करतो असे म्हणणे म्हणजे हा वाल्मिकी ऋषी आणि वाल्याचाही अपमान असल्याचा टोलाही मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.