Union Budget 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी प्रदीर्घ भाषण करत अर्थसंकल्प 2020 (Union Budget 2020) मांडला. या अर्थसंकल्पावरुन देशभरातील विविध क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तर, विरोधकांनी थेट टीका केली आहे. भाजपचा एकेकाळचा मित्र शिवसेनेनेसुद्धा अर्थसंकल्पावरुन जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात 'अर्थ' नाही पण, 'शब्दरत्न' मात्र बक्कळ असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना मुखपत्र दै. सामना संपादकीयातून ही टीका करण्यात आली आहे.
सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे
- “संत तुकारामांनी एका अभंगात ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे. अभंगात त्याचा आशय वेगळा असला तरी केंद्रातील मोदी सरकारची अवस्था सध्या एका अर्थाने अशीच झाली आहे का? अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी आपल्या रेकॉर्डब्रेक भाषणातून तब्बल १८ हजार ९२६ ‘शब्दरत्नां’ची उधळण केली. सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ!.”
- “अर्थसंकल्पातील तरतुदींचे आकडे काही लाख कोटींमध्ये असले तरी सरकारी कंपन्या विकून तिजोरी भरण्याची धडपड पाहता या तरतुदींची अवस्था ‘पैसा कमी; तरतुदी उदंड अशीच होणार आहे. संत तुकारामांनी एका अभंगात ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने’ असे म्हटले आहे. अभंगात त्याचा आशय वेगळा असला तरी केंद्रातील मोदी सरकारची अवस्था सध्या एका अर्थाने अशीच झाली आहे का? शनिवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना केलेले भाषण त्याचेच निदर्शक नाही का? अर्थसंकल्पात फसव्या घोषणा, पोकळ तरतुदी असल्या तरी अर्थमंत्र्यांनी आपल्या रेकॉर्डब्रेक भाषणातून तब्बल १८ हजार ९२६ ‘शब्दरत्नां’ची उधळण केली. सरकारकडे ‘अर्थ’ नसला तरी ‘शब्दरत्न’ बक्कळ आहेत असाच त्याचा अर्थ!,” (हेही वाचा, Budget 2020: अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात 10 वर्षातील सर्वात मोठी घसरण; एका दिवसात 3.46 लाख कोटी बुडाले)
- “सरकारच्या आर्थिक घडामोडी आणि काहीच न देणारा अर्थसंकल्प पाहता मोदी सरकारवर दुसऱयांदा विश्वास दाखवला ही घोडचूक झाली का, असा प्रश्न मध्यमवर्गीय, नोकरदार आणि कामगार-कर्मचारीवर्गाला पडू शकतो. त्याचे काय उत्तर सरकारकडे आहे? नेहमीप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्राकडे याही अर्थसंकल्पात दुर्लक्ष करण्यात आले आहे. गुजरातमधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र बळकट करण्याचा संकल्प त्यात दिसतो, पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी मात्र काहीही विशेष नाही. हा दुजाभाव कशासाठी?.”
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर जारदार टीका केली आहे. वास्तवतेशी फारकत घेणारा अर्थसंकल्प अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन केले आहे.दुसऱ्या बाजूला, केंद्र सरकार आणि सत्ताधारी भाजपने या अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून, भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा ठरेल असे म्हटलेआहे.