मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीसाठी विधान भवन परिसरात तयारी सुरू
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credit: Facebook)

Maha Vikas Aghadi Cabinet Expansion: महाविकासआघाडी सरकार (Maha Vikas Aghadi,Maha Vikas Aghadi Government) सत्तेवर येऊन प्रदीर्घ काळ उलटला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अखेर सरकारला मुहूर्त मिळाला असून, येत्या सोमवारी (३० डिसेंबर 2019) हा विस्तार पार पडत आहे. या शपथविधीसाठी विधान भवन (Vidhan Bhavan) परिसरात तयारीही सुरु झाली आहे. दरम्यान, शपथविधीची तयारी सुरु झाली असली तरी, या शपथविधीत नेमक्या कोणत्या चेहऱ्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय चर्चा आणि उत्सुकता कायम आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम शक्यतो राजभवनावर पार पडत असतो. मात्र, गेल्या सरकारमधील (देवेंद्र फडणवीस युती सरकार) मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रम विधान भवन परिसरात पार पडला होता. त्यावेळी शपथ घेतलेल्या मंत्र्यांची संख्या अधिक होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. तर, या विस्तारातही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे शपथविधीसाठी

महाराष्ट्रात सत्तांतर होऊन भाजपचे सरकार जाऊन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सेनेकडून एकनाथ शिंदे व सुभाष देसाई यांनी, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळासाठी यादी अंतिम करण्यात काँग्रेसला विलंब होत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ३० डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आला. विधान भवन परिसराची निवड करण्यात आली आहे. निमंत्रितांना ये-जा करण्यासाठी आवश्यक असणारी प्रशस्त जागा तसेच, मंत्रालय-विधिमंडळापासून काही अंतरावरच असल्याने शपथविधीसाठी ही जागा निवडण्यात आली आहे, अशी चर्चा आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मंत्रिमंडळ शपथविधी दुपारी दोनच्या आत पूर्ण करा; राजभवनकडून राज्य सरकारला सूचना)

दरम्यान, मंत्रिमंडळ शपथविधी दुपारी दोन वाजणेच्या आत आटपावा अशी राजभवनची सूचना असल्याचे वृत्त नुकतेच प्रसारीत झाले होते. मात्र, 30 डिसेंबर रोजी पार पडणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनपर्यंत संपण्याची कोणतीही सूचना केली नलल्याचे राज्यपालांच्या जनसंपर्क विभागाने म्हटले आहे. शपथविधी सोहळा दुपारी दोन वाजेपर्यंत उरकावा अशा तोंडी सूचना राजभवानाकडून राज्य सरकाला मिळाल्याचे वृत्त होते. त्यावर अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना राजभवनाने दिल्या नसल्याचे राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार: पाहा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कोणाची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन पक्षांचे जवळपास 30 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे 10. एनसीपीचे 11 आणि कॉंग्रेसचे 8 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रीपदच्या वाटपानुसार, 42 पैकी शिवसेनेला 15, एनसीपीला 16 आणि कॉंग्रेस पक्षाला 12 मंत्रिपदं मिळू शकतात.