CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मंत्रिमंडळ शपथविधी दुपारी दोनच्या आत पूर्ण करा; राजभवनकडून राज्य सरकारला सूचना
Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari | (Photo Credit: Facebook)

CM Uddhav Thackeray Cabinet Expansion: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) सरत्या वर्षाच्या अखेरच्या काही तासांत म्हणजेच येत्या 30 डिसेंबर 2019 या दिवशी पार पडणे जवळपास नक्की झाले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या या कार्यक्रमासाठी राज्य सरकारकडून दुपारी 1 ही वेळ राजभवनाकडे मागण्यात आली आहे. पंरतू, मंत्रिमंडळ विस्ताराचा हा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्यात यावा अशा सूचना राजभवाने राज्य सरकारला दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात राष्ट्रपती राजवट (President Rule) हटवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी लगबगीने करणाऱ्या राजभवनाला दुपरी दोन वाजणेच्या आतच शपथविधी उरकण्याची घाई का झाली आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाने म्हटले आहे की, मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी यासाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्य पाल कार्यालयाला मिळाले आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार त्या पत्रास उत्तर देण्यात येईल. राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाने पुढे असेही म्हटले आहे की, मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सरकारच्या सोयीनुसार वेळ दिली जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या शपथविधीसाठीसुद्धा त्यांनी सुचवलेली वेळच देण्यात आली होती.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारानुसार शपथ घेत असलेल्या मंत्र्यांची संख्या अधिक आहे. राज्य सरकारने राजभवनाकडे पाठवलेल्या पत्रात शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागीतली आहे. त्यामुळे शपथविधी जर दुपारी एक वाजता सुरु झाला तर तो दुपारी दोन वाजता संपेन काय? असा सवाल उपस्थित करतानाच एका तासात सुमारे 30 मंत्र्यांचा शपथविधी कसा आटोपायचा असा प्रश्न सरकारसमोर उभा ठाकला आहे. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ विस्तार: पाहा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कोणाची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस अशा तीन पक्षांचे जवळपास 30 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेचे 10. एनसीपीचे 11 आणि कॉंग्रेसचे 8 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. मंत्रीपदच्या वाटपानुसार, 42 पैकी शिवसेनेला 15, एनसीपीला 16 आणि कॉंग्रेस पक्षाला 12 मंत्रिपदं मिळू शकतात.