CM Eknath Shinde meet NCP MLA Anna Bansode: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाप्रमाणेच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना गळाला लावण्यास सुरु केले आहे की, काय? असा सवाल विचारला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज शासन आपल्या दारी उपक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमास हजेरी लावली. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची भेट घेतली. आमदार अण्णा बनसोडे राज्याचे विधानपरीषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात स्वत:हून गेले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि अण्णा बनसोडे यांच्यातील भेटीचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. मात्र, या भेटीनंतर अधिकृतरित्या दिलेल्या माहितीत ही भेट केवळ अनौपचारिक आणि सदिच्छापूर्वक होती असे सांगण्यात आले आहे. आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पाठिमागील बऱ्याच काळापासून येत आहेत. त्यातच अण्णा बनसोडे यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांची झालेली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी बनसोडे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच वाहनातून प्रवास केला होता. त्याच्याही त्यावेळी बातम्या झाल्या होत्या. (हेही वाचा, Eknath Shinde Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी अखेर 'त्या' वादग्रस्त जाहिरातीवर मौन सोडलेच, काय म्हणाले घ्या जाणून)
दरम्यान, आज पुन्हा एकदा शिंदे-बनसोडे यांच्यात भेट झाली. सहाजिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या. एका बाजूला आमदार बनसोडे यांच्या नाराजीच्या चर्चा आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे यांची भेट. यामुळे आमदार बनसोडे नजिकच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेशकर्ते होतात की काय अशी चर्चाआहे.