मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर दिलेल्या त्या जाहीरातीवरुन जोरदार वाद पाहायला मिळत होता. या जाहीरात एका सर्व्हेच्या आधारेच चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाच दुय्यम स्थान दिल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आली. त्याला शिंदे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या सर्व राड्यात दस्तुरखूद्द देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देतात याबाबत उत्सुकता होती. इतके दिवस मैन बाळगून बसलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींवरुन उढालेल्या राजकीय वादळावर म्हटले आहे की, आमची मैत्री खूप जूनी आहे. ये फेविकॉल का जोड है. टुटेगा नही. आम्ही पाठीमागचे 25 वर्षे एकत्र होतो. आम्ही एकमेकांना चांगले परिचयाचे आहोत. एखाद्या जाहिरातीने इतकं सगळं होईल इतके हे सरकार तकलादू नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या सुरात सुर मिसळत एकनाथ शिंदे यांनीही देवेंद्र फडणवीस यांचा लोकप्रिय उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच फडणवीस आणि आमची मैत्री जुनी असल्याचेही त्यांनी सांगितले. आज प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीत सर्व काही अलबेल असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पालघर दौऱ्यावर होते. या दौऱ्याला दोघेही एकाच हेलिकॉप्टरमधून आले. (हेही वाचा, Eknath Shinde Vs Devendra Fadnavis: 'भाजपने औकातीत रहावे', एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांकडून थेट इशारा)
शिवसेना पक्षाकडून वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानांवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो होते. इतकेच नव्हे तर कुठल्याशा सर्व्हेचा दाखला देत राज्यात एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार आहेत. त्यांना राज्यातील जनतेचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. तर देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती दर्शविण्यात आली होती. पहिल्या पानावर दिलेल्या जाहिरातींमध्ये देवेंद्र फडणवीस यांना दुय्यम स्थान दिल्याने भाजपमध्ये नाराजी होती. त्यातून भाजप आणि शिंदे गटात वादही झाल्याचे राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियांवरुन पाहायला मिळाले होते.