Devendra Fadnavis And Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

Sanjay Gaikwad ONn BJP: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाचा स्फोट होण्यास एक जाहिरात निमित्त ठरली. या जाहिरातीनंतर दोन्ही बाजूंनी डॅमेज कंट्रोल सुरु झाले खरे. परंतू, युतीला गेलेला तडा पुन्हा भरण्याऐवीज त्याला भगदाडच पडते की काय? असा सावाल निर्माण झाला आहे. या जाहिातीने खरे तर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक सूप्त संघर्ष सुरु असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातूनच मग एकनाथ शिंदे गट (शिवसेना) आणि भाजप नेते यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याला आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे परस्परविरोधी टीका आणि वक्तव्यांची ही मालिका कुठवर लांबते याबाबत उत्सुकता आहे.

उंदराचा बैल होणार नाही, अनिल बोंडे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी नको ती स्वप्ने पाहू नयेत. उद्धव ठाकरे यांनाही मुंबई म्हणजे महाराष्ट्र असल्याचे वाटत होते. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आता तसेच वाटते आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. जनतेने आणि युतीनेही त्यांना स्वीकारले आहे. हे खरे असले तरी, त्यांनी भलती स्वप्ने पाहू नयेत. बेडूक कितीही फुगला तरीही त्याचा बैल होऊ शकत नाही, अशा तीव्र शब्दांत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी टीकास्त्र सोडले होते. (हेही वाचा, Eknath Shinde Vs Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर, मुख्यमंत्री पद कळीचा मुद्दा; भाजपला धक्का)

भाजपने आपल्या औकातीत राहावे- संजय गायकवाड यांचा थेट इशारा

भाजप खासदार अनिल बोंडे यांच्याकडून आलेल्या वक्तव्याला शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे. संजय गायकवाड केवळ प्रत्युत्तर देऊनच थांबले नाहीत. तर त्यांनी चक्क भाजपला औकातच दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदार हे वाघ आहेत. त्यांनी उठाव केला तेव्हाच यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. त्यामुळे यांनी त्या वार्ता करु नयेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर 1987 मध्ये भाजपला केवळ दोन जागा होत्या. आज त्यांचीही ताकद वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना भाजपच्या लोकांनी तारतम्य ठेवायला हवे. ते कुणामुळे आणि कोणासोबत महाराष्ट्रात सत्तेत आले आहेत याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. काही लोक बोलत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी त्यात वेळीच लक्ष घालायला हवे, असेही संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, वृत्तपत्रांमध्ये काल (13 जून) पहिल्या पानावर छापून आलेली जाहीरात अधिकृत नसल्याचे सांगण्यात शिवसेना (शिंदे गट) सांगत आहे. इतकेच नव्हे तर आज पुन्हा नवी सुधारीत जाहीरात आहे. ज्यात एकनाथ शिंदे, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे डॅमेज कंट्रोलचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न होतो आहे. त्याला किती आणि कसे यश येते याबाबत उत्सुकता आहे.