महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shiv Sena) पक्षाने मंगळवारी (13 जून) अनेक वृत्तपत्रांमध्ये पूर्ण पान जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि एकनाथ शिंदे ) (CM Eknath Shinde) यांच्या प्रतिमा ठळक आणि मोठ्या रुपात आहेत. या जाहिरातीमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची प्रतिमा मात्र गायब आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही 'नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची शिवसेना' असल्याची टीका केली आहे. उल्लेखनीय असे की, या जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेल्या जाहिरातीमध्ये दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान म्हणून नारिकांची नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती आहे. तर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाला नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. शिवसेनेने केलेल्या या दाव्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि भाजपतील फडणवीस गटाला मात्र मोठाच धक्का बसला आहे. शिवसेनेने पानभर दिलेल्या जाहिरातीमध्ये सेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्य-बाण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रतिमा आहेत. त्यात शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची कोणतीही प्रतिमा किंवा फोटो नाही. (हेही वाचा, Shrikant Shinde: भाजप-शिवसेना वाद विकोपाला, कल्याण-डोंबिवली वादावर श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा)
जाहिरातीत दावा करण्यात आला आहे की, मुख्यमंत्रिपदासाठी, महाराष्ट्रातील 26.1% लोकांना एकनाथ शिंदे आणि 23.2% लोक देवेंद्र फडणवीस यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवतात. तर महाराष्ट्रातील 49.3% त्यांच्या राज्याच्या नेतृत्वासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात मजबूत युती पाहण्याची इच्छा दर्शवत असल्याचे म्हटले आहे. जाहिरातीतील आकडेवारी आणि दावे झी टीव्ही-मॅट्रिझच्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन करण्यात आले आहेत.
निवडणूक सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील 30.2 टक्के नागरिक भारतीय जनता पक्षाला पसंती देतात, तर 16.2 टक्के नागरिक शिवसेनेला (एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील) पसंती देतात. या आकडेवारीवरून असे दिसून येते की महाराष्ट्रातील एकूण 46.4 टक्के लोकांचा राज्याच्या विकासासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना युतीवर विश्वास आहे, असे जाहिरातीत म्हटले आहे.
या जाहिरातीला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे (यूबीटी) संजय राऊत म्हणाले, आधी बाळासाहेबांची शिवसेना होती. पण या जाहिरातीमुळे हवा साफ झाली आहे. ती आता नरेंद्र मोदी-अमित शहांची शिवसेना झाली आहे. जाहिरातीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा किंवा फोटो कुठे आहे? असेल तर दाखवा असे आव्हानच राऊत यांनी टीका करताना दिले आहे.