उद्धव ठाकरे यांची सामनामधील मुलाखत म्हणजे एक प्रकारे मॅचफिक्सिंगचं, धाडस असेल तर इतर वृत्त वाहिन्यांना मुलाखत द्या; चंद्रकांत पाटील यांची खोचक टिका
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेना मुखपत्र सामना (Daily Saamana) या दैनिकासाठी मुलाखत दिली होती. या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.

आज या मुलाखतीचा दुसरा भाग सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांची सामनातील मुलाखत म्हणजे मॅचफिक्सिंगसारखीचं आहे. धाडस असेल तर इतर वृत्त वाहिन्यांनादेखील मुलाखत द्या, त्यांच्या संपादकांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, असा खोचक टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी लगावला आहे. (हेही वाचा - CM Uddhav Thackeray Interview: केंद्रातील एनडीए सरकार 30-35 चाकांची रेल्वेगाडी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला)

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. काळजी करण्यासारखे काही नसल्याचे सांगितले जात असले, तरी काळजी करण्यासारखे खूप काही आहे. परिस्थिती भयानक आहे. तसेच सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक मुख्यमंत्री मातोश्रीत बसून राज्य चालवत आहेत. तर दुसरे महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्र चालवत आहेत. आता तुम्हीचं ओळखा ते कोण आहेत? असा खोचक टोलादेखील यावेळी पाटील यांनी लगावला आहे.