Rohit Pawar, Pankaja Munde in Chala Hawa Yeu Dya | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमात थुकरटवाडी (Thukratwadi) मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात चांगलीच टोलेबाजी बाहायला मिळाली. अर्थात ही टोलेबाजी केवळ प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमधून दिसत आहे. मुख्य कार्यक्रम लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या कार्यक्रमात पंकजा मुंडे, रोहित पवार यांच्यासोबत , भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe-Patil) हे देखील उपस्थित होते.

कार्यक्रमावेळी एक रिंग टाकण्याचा खेळ घेण्यात आला. या वेळी रोहित पवार यांची बाजू काहीशी अधिक गुण मिळवताना दिसत होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी रोहित पवार यांच्याकडे पाहून ''तुम्ही माझ्या घरातील सगळ्या व्यक्तींना फोडू नका' असा टोला लगावला. त्यावर रोहित पवार यांनी 'घरच्यांना माहित असतं की आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे', अशी मिष्कील प्रतिक्रिया दिली. यानंतर उपस्थितांनी या टोलेबाजीला मनमुराद दाद दिली.

दरम्यान, भिन्न पक्षाचे असले तरी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आल्यानंतर राजकीय नेते कसे एकमेकांशी खेळीमेळीने वागतात याचेही दर्शन अशा कार्यक्रमांमधून घडते. राजकीय विचार, भूमिका वेगळ्या असल्या तरीही सार्वजनिक जीवनात एकत्र आल्यानंतर मैत्र जपण्याची महाराष्ट्राती जुनी परंपरा आहे.

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून या आधी अनेक राजकीय नेते थुकरटवाडीत येऊन गेले आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम विनोदी असल्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात तो पोहोचला आहे. या कार्यक्रमाने आपला खास असा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे.