CR Mumbai Local Mega Block: मध्य रेल्वे (Central Railway) कडून आज मध्यरात्रीपासून ठाणे (Thane) आणि सीएसएमटी (CSMT) स्थानकांत 63 आणि 36 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आज रात्रीपासून रेल्वे सेवा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांना या विकेंडला प्रवासाचं नियोजन करूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकामध्ये 24 डब्ब्यांच्या मेल एक्सप्रेस साठी फलाट क्रमांक 10-11 ची लांबी वाढवण्याचे आणि ठाणे स्थानकामध्ये फलाट क्रमांक 5 च्या रूंदीकरणाचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. आज मध्यरात्री 12.30 पासून ब्लॉक घेतला जाणार असून रविवार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. या विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक दरम्यान 956 लोकल ट्रेन तर 72 मेल एक्सप्रेस बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेकडून शनिवारी देखील रविवारच्या वेळापत्रकाने ट्रेन धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात स्थानकांमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्य असल्यास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून पडून झालेला मृत्यू अपघातच, मुंबई हायकोर्टाचे भरपाई देण्याचे दिले आदेश .
दिनांक ३०/३१.५.२०२४ च्या मध्यरात्री (गुरुवार/शुक्रवारी रात्री) ते दि. ०२.६.२०२४ च्या दुपारपर्यंत प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरण/विस्ताराच्या संदर्भात मध्य रेल्वे ठाणे येथे ६३ तासांचा विशेष ब्लॉक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ३६ तासांचा विशेष ब्लॉक परिचालीत करणार आहे. pic.twitter.com/8SQhaYIObF
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) May 30, 2024
ठाण्यात 63 तासांचा ब्लॉक
मध्य रेल्वेकडून ठाण्यात 63 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हा ब्लॉक कळवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप डाऊन धीम्या आणि अप जलद मार्गावर असणार आहे. 31 मे पासून रात्री 12.30 ते 2 जूनला दुपारी 3.30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. यामध्ये डाऊन जलद मार्गावरील लोकल, मेल, एक्सप्रेस गाड्या पर्यायी मार्गावरून चालवल्या जाणार आहे. या ब्लॉक मध्ये फलाट रूंदीकरणाचं काम होईल. 725 प्री कास्ट बॉक्सच्या माध्यमातून मॉड्युलर फलाट उभारले जाणार आहेत.
सीएसएमटी स्थानकात 36 तासांचा ब्लॉक
सीएसएमटी स्थानकात फलाट क्रमांक 10-11 ची लांबी वाढवण्याचे काम होईल. हा ब्लॉक 1 जूनच्या मध्यरात्री 12.30 ते 2 जून च्या दुपारी 3.30 पर्यंत असणार आहे. यामध्ये सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान लोकल फेर्या रद्द असणार आहेत.
दरम्यान खाजगी कार्यालयांत शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम चा पर्याय देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेचा मेगा ब्लॉक पाहता बेस्ट कडून या काळात अतिरिक्त बस चालवल्या जाणार आहेत.