कसारा, खोपोली रेल्वे प्रवाशांसाठी लवकरच धावणार 15 डब्ब्यांची जलद लोकल; मध्य रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मध्य रेल्वेवर (Central Railway) प्रवाशांची वाढती संख्या परिणामी होणारे अपघात आणि गैरसोय या साऱ्यावर उत्तर म्ह्णून लवकरच कसारा (Kasara), बदलापूर (Badlapur), खोपोली (Khopoli) कडे जाणाऱ्या 15 डब्यांच्या जलद लोकल सुरु करण्यात येणार असल्याचे समजत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून संबंधित प्रस्ताव हा वर्षभरापूर्वीच तयार करण्यात आला होता, ज्याला आता ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने हिरवा कंदील दाखवला असून लवकरच या कामाला सुरुवात होईल. तब्बल 490 कोटींचा हा प्रकल्प येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करून मध्य रेल्वे गर्दीतून जीव वाचवत प्रवास करणाऱ्यांना दिलासा देऊ शकते.

Mumbai Local Ladies' Special: मध्य रेल्वेवर धावणार CSMT- Panvel, CSMT- Kalyan या दोन नव्या महिला विशेष लोकल

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत,हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार असल्याचे सांगितले आहे. पहिल्या टप्प्यात कल्याण ते बदलापूर, दुसऱ्या टप्प्यात कल्याण ते आसनगाव आणि तिसऱ्या टप्प्यात बदलापूर ते खोपोली आणि आसनगाव ते कसारा असे काम केले जाईल. पंधरा डब्याच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, ओव्हरहेड वायर सहित अन्य तांत्रिक कामे देखील याच स्वरूपात पार पडतील.

दरम्यान, साधारण दहा वर्षांपूर्वी मध्य रेल्वे वर सीएसएमटी ते कल्याण पंधरा डबा जलद लोकल गाडी धावली होती. आता ही संख्या दोन लोकल एवढी आहे दिवसभरात या गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात. मात्र कल्याणच्या पुढे प्रवास करणाऱ्यांना या लोकलचा फारसा फायदा होत असल्याचे दिसत नाही. अशातच बदलापूर, खोपोली, कसारा, कर्जत, अंबरनाथ या ठिकाणची लोकसंख्या मागील काही वर्षात सातत्याने वाढली आहे. या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी या 15 डब्याच्या जलद लोकल कामी येतील.