Mumbai Local Ladies Special (Photo Credits: File Image)

मुंबई लोकल (Mumbai Locals) मधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने (Central Railway) आज एक आनंदाची घोषणा केली आहे. आज, 5  नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या स्थापना दिनाच्या औचित्यावर दोन लेडीज स्पेशल लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. याबाबत ANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हॅण्डलवरून माहिती देण्यात आली असून, यानुसार आजपासून छत्रपती शिवाजी  महाराज टर्मिनस (CSMT) कडून पनवेल (Panvel) आणि कल्याण (Kalyan) कडे जाणाऱ्या या दोन लेडीज स्पेशल ट्रेन्स (Ladies Special Locals)  धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर आज संध्याकाळी धावणार महिलांसाठी विशेष सीसीटीव्हीयुक्त लोकल

कल्याण आणि पनवेल ही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गर्दीची स्थानके म्ह्णून ओळखली जातात. साहजिकच या ठिकाणी महिला प्रवाशांची संख्या सुद्धा अधिक आहे. हीच बाब लक्षात घेत आज मध्य रेल्वेने या दोन गाड्या सुरु केल्या आहेत. यापूर्वी, मध्य रेल्वेवर सकाळी कल्याण वरून सीएसएमटी कडे जाणारी आणि आणि संध्याकाळी सीएसएसमटी वरून कल्याण कडे जाणाऱ्या लेडीज स्पेशल ट्रेन आहेत.तर हार्बर मार्गावर सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी सीएसएमटी- पनवेल तर ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल या लेडीज स्पेशल गाड्या आहेत. यासोबतच आजपासून या नव्या दोन ट्रेन्स देखील धावणार आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, महिला प्रवाशांसाठी रेल्वे कडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात. पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांसाठी सुरु असणारा सखी ग्रुप , महिला डब्ब्यात लावण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरा व रात्री विशेष पोलीस बंदोबस्त ही या उपक्रमांची यशस्वी उदाहरणे आहेत. अलीकडे महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता या लेडीज स्पेशल लोकल फेऱ्या हा अत्यंत आवश्यक निर्णय म्हणता येईल.