रोज म.रे. त्याला कोण रडे अशी अवस्था झालेली मध्य रेल्वे (Central Railway) ही रोज काही ना काही तांत्रिक अडचणींमुळे उशिराने धावतच असते. त्यात जर ती वेळेवर आली तर रेल्वे प्रवाशांना सुखद धक्का असतो. ऐन गर्दीच्या वेळी आज सकाळपासूनच रड लावलेल्या मध्य रेल्वेची सेवा आता नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास उशिराने धावत आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्याहून (Thane) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (CSMT) जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली असून ही सेवा धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या कारणाने ही मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे.
ऐन गर्दीच्या वेळी सकाळी ठाणे (Thane) ते मुलुंड (Mulund) स्थानकादरम्यान जलद मार्गावरील रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे जलद मार्गावरील रेल्वे धीम्या मार्गावर वळविल्याने मध्य रेल्वेची वाहतूनक 15 मिनिटे उशिराने धावत होती. त्यातच आता नेत्रावती एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने ठाणे ते सीएसएमटी जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून ती धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे. या कारणामुळे आता मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने धावत आहे.
हेदेखील वाचा- मुंबई: ठाणे - मुलुंड स्थानकादरम्यान रेल्वे रूळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
सकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने नोकरदार मुंबईकरांच्या नाकी नऊ आले होते. रेल्वे उशिराने धावत असल्यामुळे फलाटावरही प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. तर रखडत रखडत का होईना कामाला गेलेल्या नोकरदार वर्गाला आता पुन्हा अर्धा तास मध्य रेल्वे उशिराने धावत असल्या कारणाने संध्याकाळी घरी परतणा-या प्रवाशांना पुन्हा मनस्ताप होणार असं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.