Savitribai Phule University Pune (Photo Credits: Wikimedia Commons)

पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅप साँगचं शूटिंग करण्यात आलं आहे. ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलवर दारुची बाटली ठेवून शुभम जाधव या रॅपरने रॅप साँग म्हटलं आहे. या प्रकरणी शुभम विरोधात चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅप साँग तयार करण्यासाठी विद्यापीठातल्या ज्या कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर शुभम विरोधात तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार निंदनीय आहे असं युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, या रॅप साँगमध्ये वापरलेली भाषा आणि त्यात वापरण्यात आलेली साधनं ही विद्यापीठाच्या परिसरात वापरणं हा अत्यंत भयानक प्रकार आहे. आम्ही पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्ते जेव्हा या विद्यापीठाच्या परिसरात येतो तेव्हा सगळ्यांची चौकशी सुरक्षारक्षकांकडून केली जाते आणि कमीत कमी पदाधिकाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला जातो. याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. एबीपीमाझाने याबद्दल वृत्त दिले.