Bombay High Court on Marriage: कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्या महिलेने आपल्या पतीला मद्यपी (Alcoholic) आणि व्यभिचारी (Adulterer) म्हटले तर ती क्रूरता आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोंदवले आहे. कोर्टाने आपल्या निर्णयात कौटुंबिक न्यायालयाचा (Family Court) तो आदेश कायम ठेवला आहे ज्यात विवाह रद्द करण्याचे म्हटले होते.
न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने 50 वर्षीय महिलेची याचिका फेटाळून लावली. महिलेने आपल्या याचिकेत पुण्यातील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. कौटुंबिक न्यायालयाने नोव्हेंबर 2005 मध्ये हा आदेश दिला होता. महिलेचा विवाह लष्करी अधिकाऱ्याशी झाला होता. हायकोर्टात केस चालली होती, त्याच दरम्यान पतीचाही मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Fire Due to Firecrackers in Thane: ठाण्यात दिवाळीच्या रात्री फटाक्यांमुळे 11 ठिकाणी आग; कोणतीही जीवितहानी नाही)
महिलेने दावा केला होता की, तिचा पती मद्यपी आणि चारित्र्यहीन होता. त्यामुळे तिला वैवाहिक जीवनाचे मूलभूत अधिकारही दिले गेले नाहीत. दरम्यान, खंडपीठाने म्हटले आहे की, या महिलेने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीचे चारित्र्य धुळीस मिळवले असून त्याची प्रतिमा मलिन केली आहे, त्यामुळे हे प्रकरण क्रुरतेचे आहे. न्यायालयाने सांगितले की, महिलेने तिच्या आरोपांना पुष्टी देण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.
त्याचवेळी महिलेच्या दिवंगत पतीची बाजू मांडणाऱ्या वकिलाने सांगितले की, अशा आरोपांमुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मानसिक छळ इतका होतो की, तो एकत्र राहण्याची हिंमत करत नाही, तेव्हा त्याला क्रूरता म्हणून वर्गीकृत केले जाते.