
Fire Due to Firecrackers in Thane: सोमवारी 24 ऑक्टोबर रोजी देशभरात दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते, मात्र यादरम्यान काही ठिकाणी आगीच्या घटनाही घडल्या. ठाण्यात (Thane) दिवाळीनिमित्त फटाक्यांमुळे (Firecrackers) 11 ठिकाणी आग (Fire) लागली. ठाणे महापालिकेने यासंदर्भात माहिती दिली. महापालिकेने सांगितले की, ठाणे अग्निशमन दलाला सोमवारी आगीच्या घटनांबाबत एकूण 16 दूरध्वनी आले, त्यापैकी 11 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली होती. मात्र या आगीच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पालघर जिल्ह्यातील वसई परिसरात सोमवारी रात्री चपला गोदामाला आग लागली. यासंदर्भात माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन विभागाने सांगितले. याशिवाय देशाच्या विविध भागांतून फटाक्यांमुळे पेट घेतल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. (हेही वाचा - Murder: मुंबईत फटाके फोडण्यावर आक्षेप घेतल्याने 21 वर्षीय तरुणाची हत्या, आरोपी फरार)
आंध्र प्रदेशात फटाक्याच्या दुकानाला आग, दोघांचा मृत्यू
आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे दोन दिवसांपूर्वी फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागली होती. आगीने हळूहळू संपूर्ण दुकानाला वेढा घातला आणि आजूबाजूच्या अनेक दुकानांनाही आग लागली. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे रविवारी पहाटे एका फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला. आग लागलेल्या तीन दुकानांपैकी एका दुकानात कामगार झोपले होते, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अशीच एक घटना राजस्थानच्या अजमेर शहरातून समोर आली आहे. अजमेर शहरालगतच्या ग्रामीण भागातील एका फटाक्यांच्या दुकानाला रात्री उशिरा भीषण आग लागली. या भीषण आगीत दुकानात असलेले पंधरा लाख रुपये किमतीचे फटाके काही मिनिटांत राख झाले. ही घटना अजमेर जिल्ह्यातील मसूद शहराजवळील बेगलियावास गावातील आहे.