Suicide | (Photo credit: archived, edited, representative image)

Bank Manager Suicide: पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) शाखेचे मुख्य व्यवस्थापक शिवशंकर मित्र (वय 50) यांनी आपल्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना गुरुवारी रात्री 10 ते 12 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात आणि बारामती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताच्या पँटच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये त्यांनी कामाच्या ताणामुळे आत्महत्या करत असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यांनी कोणालाही जबाबदार धरलेले नसून, सहकाऱ्यांवर कोणताही दबाव आणू नये आणि त्यांच्या कुटुंबाचा या घटनेशी काहीही संबंध नसल्याचेही स्पष्टपणे नमूद केले आहे. (हेही वाचा - Rohit Pawar Threatens Cops: 'आवाज खाली करा...'; मुंबईच्या आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये रोहित पवारांची पोलिसांना धमकी दिली, पहा व्हिडिओ)

शिवशंकर मित्र यांनी 11 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ते सध्या नोटीस कालावधीवर होते. आरोग्य समस्या आणि कामाचा वाढता ताण यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले की, शिवशंकर मित्र बँकेच्या कार्यालयात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या पत्नीने ते घरी परतले नसल्याने पोलिसांना कळवले होते. बँकेतील कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाहणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब उघडकीस आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.