Mumbai Congress Chief Bhai Jagtap (Photo Credits: ANI)

मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत (BMC Elections 2022) काँग्रेस (Congress) स्वतंत्र्यपणे उभी राहणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी आज पुन्हा एकदा सांगितले. त्यामुळे पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी सोबत काँग्रेस नसेल हे आता स्पष्ट झाले आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेशी बोलताना जगताप म्हणाले की, "सर्व 227 जागा काँग्रेस पक्ष एकट्याने लढवेल, असे पहिल्या दिवसापासूनच मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी हे सांगत आलो आहे. हे मी पहिल्यांदाच सांगत नाही. 1999 आणि 2014 मध्ये आमची राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्यासोबत युती होती. परंतु, मुंबई पालिकेच्या निवडणूका आम्ही एकट्याने लढलो आहोत."

मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या भाई जगताप यांनी पक्षश्रेष्ठींकडे एकट्याने निवडणूक लढवून देण्याची विनंती केली आहे. तसंच मुख्यमंत्र्यांच्या 'चप्पल' वक्तव्यावर बोलताना जगताप म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य त्यांच्या पक्षाला प्रोत्साहित करेल. पण आम्ही निवडणुका एकट्यानेच लढवणार." त्यामुळे यावर सध्या राज्यातील काँग्रेसचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. (शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित मिळून 5 वर्ष सरकारमध्ये राहतील- संजय राऊत)

काही दिवसांपूर्वीच झालेल्या शिवसेनाच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकट्याने निवडणुक लढवण्याचे भाष्य करणाऱ्या पक्षांवर नाव न घेता टीका केली होती. "काही पक्ष एकट्याने निवडणुक लढवण्याचे म्हणत आहेत. जर त्यांनी असे केले तर लोक त्यांना चप्पलेने मारतील", असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यानंतर भाई जगताप यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष एकट्यानेच निवडणुक लढवणार असल्याचा पुर्नउच्चार केला आहे. (Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका)

दरम्यान, यापूर्वी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पुढील विधानसभा निवडणुकीत पक्ष एकट्याने लढणार असल्याचे सांगितले होते. जर पक्षश्रेष्ठींनी अशी भूमिका घेतली तर मी मुख्यमंत्र्यांनाही सामोरे जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले होते. तसंच महाविकास आघाडी युती ही 5 वर्षांसाठी आहे. कायमस्वरुपी नाही, असेही पटोले म्हणाले होते.