भाजपाचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची येत्या 3 जून रोजी पुण्यतिथी (Punyatithi) आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीला साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा आणि घरातचं फोटोसमोर दोन दिवे लावून त्यांना अभिवादन करा, असं आवाहन पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे. तसेच 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम गोपीनाथ गडावरच होईल. मात्र, कार्यक्रम लाईव्ह असेल त्यामुळे कोणीही गडावर गर्दी करु नये, अशा सूचनादेखील पंकजा मुंडे यांनी दिल्या आहेत.
पंकजा मुंडे यांनी आपल्या वडिलांच्या आठवणीत फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 3 जून हा दिवस उजाडलाचं नाही पाहिजे, असं वाटतं. 3 जून रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा सहावा पुण्यस्मरण दिवस आहे. हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून मुंडे समर्थक साजरा करतात. मात्र, सध्या कोरोनामुळे राज्यासह बीड जिल्ह्यातही लॉकडाऊन आहे. त्यामुळे गर्दीच्या सर्वच कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. गोपीनाथ गडावर अगदी काही लोकांच्या उपस्थितीत मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे. पुण्यतिथीचा कार्यक्रम सोशल मीडियाद्वारे लाईव्ह होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी किंवा मला भेटण्यासाठी येऊ नये, अशा सुचनाही पंकजा मुंडे यांनी केल्या आहेत. (हेही वाचा - Locust Attack In Maharashtra: महाराष्ट्र राज्यात 50% टोळधाडीचा नाश - कृषीमंत्री दादा भुसे यांची माहिती)
दरम्यान, 3 जून रोजी नागरिकांनी आपापल्या घरात मुंडे साहेबांच्या फोटो समोर उभे रहावे. उजव्या बाजूला घरातील महिला, तर डाव्या बाजूला पुरुष उभे राहतील. दोन समई किंवा दिवे लावून अभिवादन करा. मुंडे साहेबांच्या आवडीचा पदार्थ करा. तो काय हे मी सांगायची गरज नाही, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. दुपारी 12 ते संध्याकाळी 6 या वेळेत अन्नदान, रक्तदान, मास्क किंवा औषधाचे वाटप करा, त्याचे फोटो माझ्या सोशल मीडियावर पाठवा, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.