स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी- चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील (Photo credit : facebook)

सध्या संपूर्ण देशात कोरोनाची लाट पसरत चालली असून यातून वाचण्यासाठी देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. यामुळे कामधंदे पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे पोटाची खळगी भरायची कशी असा प्रश्न पडलेले स्थलांतरित मजूरांना आता आपल्या गावाकडचा रस्ता धरला आहे. गरीब परिस्थितीमुळे अनेक मजूर पायीच प्रवास करत आहे. अशा स्थलांतरित मजूरांना तसेच त्यांच्या कुटूंबांना गावी परतण्यासाठी राज्य शासनाने व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, शहरी भागातून आपल्या गावी बसेसने जाणाऱ्यांकडून दुप्पट भाडे आकारण्याचा शासन आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

औरंगाबादमध्ये शुक्रवारी घडलेल्या घटनेत अशाप्रकारे पायी जाणाऱ्या मजुरांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे अशा सर्व स्थलांतरित मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हेदेखील वाचा- देवेंद्र फडणवीस राज्याचे देणे लागत असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत महाराष्ट्रासाठी केंद्राकडे निधी मगावा: संजय राऊत

“केंद्र सरकार सर्व प्रवाशांचा 85 टक्के खर्च उचलत आहे. केवळ 15 टक्के भार हा राज्य सरकारला उचलायचा आहे. महाराष्ट्रातील मजुरांचे स्थलांतराचे प्रमाण पाहता राज्य सरकारने हा भार उचलून केंद्र सरकारकडे अतिरिक्त रेल्वे गाड्यांची मागणी करावी, आणि या सर्व प्रवाशांचा आपापल्या गावी परतण्याचा मार्ग सुकर करावा,” असंही त्यांनी नमूद केलं.

सद्य स्थितीत महाराष्ट्रात सद्य स्थितीत 19063 रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासांत या आजारामुळे 37 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-19 मुळे एकूण मृत्यूंची संख्या 731 झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण 3470 लोक बरे झाले आहेत.