देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यातील भाजप (BJP) नेते हे जर महाराष्ट्राचे देणे लागत असतील तर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारसोबत केंद्राकडे निधी मागावा. ही वेळ कोणावर टीका करण्याची नाही. सर्वांनी एकदिलाने काम करण्याची आहे, असा टोला शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यानी लगावला आहे. महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत वाढणारे कोरोना व्हायरस संक्रमितांचे आकडे यात राज्य सरकारचा काहीही दोष नाही. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. तसेच, या शहरात भारतभरातून लोक घुसतात त्यामुळे ही संख्या वाढते आहे, असेही राऊत म्हणाले.
राज्यातील कोरोना व्हायरस संकट नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जोरदा प्रयत्न करत आहेत. राज्याला निधी मिळविण्यासाठी आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याची चांगला समन्वय ठेऊन आहेत. असे असताना विरोधी पक्षाने टीका करण्याचे कारण नाही, असेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज उद्या भरण्याची शक्यता; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे संकेत)
दरम्यान, केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारत आणि अवघे जग कोरोना व्हायरस संकटाशी मुकाबला करत आहे. महाराष्ट्रासोबत देशातील इतर राज्येही कोरोना व्हायरस विरोधात संघर्ष करत आहेत. शेजारील गुजरात राज्यात कुरोनामुळे अत्यंत भयानक स्थिती आहे. पण, आम्ही त्याबबत बोलणार नाही. ही वेळ टीका करण्याची नाही. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात काय चालले आहे हे एकदा पाहा, असा टोलाही संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.