मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज उद्या भरण्याची शक्यता; शिवसेना खासदार संजय राऊत यांचे संकेत
Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Legislative Council Election 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज उद्या (10 मे 2020) दाखल करण्याची शक्यता आहे. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (anjay Raut) यांनी तसे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अर्ज केव्हा दाखल करणार आहेत. शिवसेनेने त्यासाठी काय तयारी केली आहे? असे विचारले असता संजय राऊत यांनी असे संकेत दिले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. दरम्यान, अवघे राज्य कोरोनाशी लढते आहे. ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. मुख्यमंत्र्यांचे निवडणूक अर्ज भरणे ही केवळ औपचारिकता आहे. त्यामुळे विशेष अशी काही तयारी नाही.

कोरोना व्हायरस नियंत्रण करताना राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांवरुन विरोधी पक्ष टीका करत आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राज्य सरकारवर भाजप हाच एकमेव विरोधी पक्ष टीका करतो आहे. बाकीचे पक्ष टीका करत नाहीत. खरं म्हणजे भाजपने टीका करण्याचे कारण नाही. कोरोना व्हायरस हे संकट काही एकट्या महाराष्ट्रावर नाही. देश आणि संपूर्ण जगावर आहे. त्यामुळे हे संकट नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका करण्याचे कारण नाही. (हेही वाचा, विधान परिषद निवडणूक: भाजपच्या जागावाटपावरुन केंद्रीय मत्री रामदास आठवले नाराज)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकट निवारण्यासाठी महाराष्ट्र चांगल्या प्रकारे काम करत आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये काय करत आहेत याकडेही लक्ष द्यायला हवे. महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. पण, आम्ही बोलणार नाही. ही वेळ टीका करण्याची नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.