Maharashtra Legislative Council Election 2020: विधान परिषद निवडणूक 2020 साठी भारतीय जनता पक्षाने आपले एकूण 4 उमेदवार जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवरुन प्रत्यक्ष भाजप (BJP) आणि भाजपच्या मित्रपक्षांमध्येही नाराजी आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनीही ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. रामदास आठवले यांनी ट्विटरद्वारे ही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाला एकही जागा सोडली नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे.
रामदास आठवले यांनी आपल्या ट्वटमध्ये म्हटले आहे की, ''महाराष्ट्रात 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील 1 जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइं ची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा रिपाइं ला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत''.
दरम्यान, विधानपरिषद जागावाटपावरुन भाजपचे मित्रपक्षच काय खुद्द भाजपमध्येही नाराजी आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट कापलेल्या आणि पराभूत झालेल्या नेत्यांचे पुनर्वसन विधानपरिषदेच्या माध्यमातून केले जाईल, अशी चर्चा होती. भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांचीही तिच भावना होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. भाजपने प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील या नव्या चेहऱ्यांना संधी दिली. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Election 2020: भाजप उमेदवार प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द)
रामदास आठवले ट्विट
महाराष्ट्रात 21 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होत असून त्यातील 1 जागा भाजप ने रिपब्लिकन पक्षाला द्यावी अशी रिपाइं ची मागणी होती. मित्रपक्ष म्हणून भाजप च्या वाट्याला येणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा रिपाइं ला न सोडल्याने रिपाइं कार्यकर्ते नाराज आहेत.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) May 8, 2020
प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देत एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या माजी मंत्र्यांचा पत्ता कापला. इतकेच नव्हे तर माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासारख्या ज्येष्ठ प्रवक्त्यांचाही भाजपने पत्ता कापला आहे. दुसऱ्या बाजूला मित्रपक्षांनाही भाजपने एकही जागा सोडली नाही. त्यामुळे भाज पक्षात अंतर्गत आणि मित्रपक्षांतही नाराजी आहे.