BJP President Mumbai & Maharashtra: आशिष शेलार मुंबईतून तर, चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड
Ashish Shelar, Mumbai, Chandrashekhar Bawankule | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या प्रादेशिक नेतृत्वात बदल केला आहे. त्यानुसार मुंबई भाजप अध्यक्ष म्हणून आशिष शेलार (Ashish Shelar) तर महाराष्ट्र भाजप अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटासोबत भाजपने सत्ता स्थापन केली. या सरकारचा शपथविधी नुकताच पार पडला. या शपथविधीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्ष पद लवकरच रिक्त होईल, अशी चर्चा होती.

आशिष शेलार हा भाजपचा मुंबईतील एक आक्रमक चेहरा म्हणून ओळखला जातो. आशिष शेलार हे स्वत: वकिल आहेत. त्यामुळे त्यांना कायद्याचा अभ्यास आहे. अनेकदा विधिंडळात किंवा विधिमंडळाबाहेर विविध मुद्द्यांवर आशिष शेलार हे मुद्देसूद बोलताना दिसतात. मुंबईत मोठी ताकद असलेल्या आणि महापालिकेत अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. सत्तेत बलाढ्य असलेली शिवसेना सध्या बॅकफूटला गेली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत मुंबईमध्ये भाजप मोठ्या प्रमाणावर वाढविने हे शेलार यांच्यासमोरील मोठे आव्हान असेल.

दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचा ओबीसी चेहरा आहेत. पाठिमागील काही दिवसांपासून ते जोरदार सक्रीय झाले होते. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपने त्यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे बावनकुळे यांची भाजपमध्ये गच्छंती झाल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र, पुढे भाजने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली आणि आता त्यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. महाविकासआघाडीचा प्रयोग झाल्यामुळे राज्यात बॅकफूटला गेलेली भाजप पुन्हा फ्रंटवर आणण्याचे मोठे आव्हान बावनकुळे यांच्या समोर असेल. त्यातच सत्ताधारी राहिलेल्या शिवसेनेत झालेल्या बंडाचा फायदा घेण्याची संधीही पक्षवाढीसाठी बावनकुळे यांना मिळणार आहे.