NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा
Rahul Narwekar, Ajit pawar, Sharad Pawar (PC -Facebook)

NCP MLA Disqualification Verdict: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी गुरुवारी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या विरोधातील शरद पवार (Sharad Pawar) गटाचा अपात्रतेचा अर्ज फेटाळून लावला. नार्वेकर यांच्या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे.

भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) नुकतेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव 'NCP' आणि मतदान चिन्ह म्हणून घड्याळाचे वाटप केले होते. तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ असे नाव देण्यात आले आहे. आता सभापती राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांचा गटचं खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे अजित पवार गटातील आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वाचा -Ashok Chavan Files Nomination For Rajya Sabha Election: भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल)

अजित पवारांचा गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -

गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या विरोधात बंड केले. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. (वाचा - ठाकरे गटाचे उपनेते Babanrao Gholap यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण)

तथापी, या महिन्याच्या सुरुवातीला, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली होती आणि त्यांना पक्षाचे घड्याळ चिन्ह दिले होते. दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘खरी’ राष्ट्रवादी म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अजित पवारांच्या बाजूने गेल्या आठवड्यात कॅव्हेट दाखल केले आहे.