Nana Patole (फोटो सौजन्य - ANI)

Nana Patole Resigns As Maharashtra Congress Chief: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections 2024) पक्षाच्या निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष (Maharashtra Congress Chief) नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी राजीनामा (Resigns) दिला. पटोले यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस (Congress) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 103 जागांपैकी फक्त 16 जागांवर विजय मिळवता आला. ही काँग्रेसची राज्यातील आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघात पटोले यांनी केवळ 208 मतांच्या फरकाने विजय मिळविला.

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) युतीचा भाग असलेल्या काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जागांचा उंबरठा ओलांडून तब्बल 232 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. याउलट महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (UBT), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. (हेही वाचा -Maharashtra Election Results 2024: नाना पटोलेंपासून रोहित पवारांपर्यंत सर्वात कमी फरकाने विजयी झालेल्या प्रतिष्ठित आमदारांची यादी)

नाना पटोले यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारलेले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील 17 पैकी 13 जागा मिळवून काँग्रेसने जोरदार कामगिरी केल्यानंतर, काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर महाराष्ट्रातील जबाबदारी दिली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील तणाव वाढू लागला. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे संबंध ताणले गेले होते. (हेही वाचा - Nana Patole On BJP: राज्यात भाजप पक्षाचा काउंटडाऊन सुरू; काँग्रेस नेते नाना पटोले यांचे वक्तव्य)

निवडणूक निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस अगोदर पटोले यांनीही काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करेल, असा दावा केला होता. त्यांच्या या विधानाने शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले हे त्यांच्या धाडसी नेतृत्वासाठी ओळखले जातात. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.