केंद्र सरकारने 10 वर्षांत अवजड वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सरकारच्या या धोरणाला ट्रकचालकांनी विरोध केला आहे. ट्रकचालक आजपासून बेमुदत बंद पुकारणार आहेत. भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनने (Bhaichara All India Truck Operator Welfare Association) याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र वनवे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने अवजड वाहनांची वयोमर्यादा 10 वर्षे निश्चित केली आहे. 1 एप्रिल 2020 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. अवजड वाहनांची वयोमर्यादा कमीत-कमी 15 वर्षांपर्यंत वाढवायला हवी. तसेच 10 वर्षांनंतर वाहनांचे इंजीन बदलून ते वाहन 10 वर्ष चालवण्याची परवानगी द्यायला हवी. तसेच थर्ड पार्टी इन्शुरन्सची वाढलेली रक्कम कमी करण्यात यावी आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणून कमी केले जावेत, अशा मागण्या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा - कोकण रेल्वेची वेबसाईट मराठीत करावी; रेल्वे प्रवासी सेवा संघाची मागणी
भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनच्या मते टोल प्लाझाचा प्रत्येक ठिकाणचा वार्षिक टोकन निश्चित करणे आवश्यक आहे. तसेच वाहनचालकांना शहराबाहेर विश्रांतीगृह आणि वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. वाहन चालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, अशा अनेक मागण्या वाहनचालक संघटनेकडून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या बंदमध्ये केवळ अवजड वाहनचालकांचा समावेश असेल.
यात राज्यात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना वगळण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाला आणि दूधपुरवठा सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी माहिती भाईचारा ऑल इंडिया ट्रक ऑपरेटर वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे.