BEST E-Bikes: मुंबईकरांसाठी बेस्टची मोठी घोषणा; ऑक्टोबरपासून 1 हजार ई-बाईक सेवेत दाखल होणार
BEST E-Bike (PC - pixabay)

BEST E-Bikes: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) उपक्रमाने गुरुवारी संपूर्ण मुंबईतील पहिल्या आणि शेवटच्या माईल कनेक्टिव्हिटीसाठी ई-बाईक सेवा (E-Bikes Services) पूर्ण प्रमाणात सुरू करण्याची घोषणा केली आहे. या सेवांद्वारे 1 हजार ई-बाईक ऑक्टोबरपासून 180 बसथांब्यांमधील व्यावसायिक आणि निवासी भागात सेवा देणार आहेत. बसमधून उतरणारे प्रवासी त्यांच्या गंतव्यस्थानावर आणि मागे जाण्यासाठी ई-बाईकचा वापर करू शकतात. ई-बाईक कोणत्याही ई-बाईक स्टेशनवर उचलल्या आणि सोडल्या जाऊ शकतात.

बेस्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'बेस्ट जून 2022 पासून या सेवेच्या सार्वजनिक चाचण्या घेत आहे. 40 हजारहून अधिक लोकांनी यासाठी नोंदणी केल्याने या सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.' सुरुवातीला या बाईक अंधेरी, विलेपार्ले, जुहू, सांताक्रूझ, खार, वांद्रे, माहीम आणि दादर येथे उपलब्ध होतील आणि नंतर शहराच्या इतर भागात विस्तारल्या जातील. जून 2023 पर्यंत 5 हजाप ई-बाईकचा ताफा वाढवण्यात येईल. ही सेवा लवकरच BEST चलो अॅपसह एकत्रित केली जाईल. (हेही वाचा - Mumbai: दसऱ्यानिमित्त मुंबईतील प्रसिद्ध राणीबाग प्राणीसंग्रहालय सर्वांसाठी खुले राहणार)

दरम्यान, बेस्ट देखील विशेष प्रवास योजना आखत आहे ज्यात बसेस आणि ई-बाईक या एकाच प्लॅनमध्ये एकत्रित केल्या जातात. अशा एकात्मिक सेवांमुळे मुंबईत कोठेही प्रवास करण्यासाठी बसचा वापर करणे अधिक सोयीस्कर होईल आणि बस प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होईल.

बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेस्ट प्रवाशांच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. चलो अॅप प्रवाशांमध्ये यशस्वी झाले आहे कारण 30 लाख वापरकर्त्यांनी ते डाउनलोड केले आहे आणि 25% पेक्षा जास्त बस प्रवासी आता ते दररोज वापरतात. ई-बाईकसह, एकात्मिक आणि अखंडपणे घरोघरी कनेक्टिव्हिटी सुरू करणारी BEST ही भारतातील पहिली बस वाहतूक ऑपरेटर बनली आहे.