(File Image)

एकमेकांच्या प्रेमात वेडेपिसे झालेल्या मामी आणि भाच्याने मिळून मामाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. माजलगाव (Majalgaon) तालुक्यात असलेल्या बाभळगाव (Babhalgaon) येथील दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या मृत्यूची आठ महिन्यांनी उकल झाली आणि हा धक्कादायक प्रकार पुढे आला. दिगंबर गाडेकर यांचा मृतदेह आठ महिन्यांपूर्वी एका विहिरीत अर्धवट स्वरुपात आढळून आला होता. मृतदेहाच्या शरीराचा अर्धाच भाग सापडल्याने पोलिसांना ओळख पटविण्यास अडचणयेत होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि या सर्व प्रकरणामागे भाचा आणि मामीच असल्याचे पुढे आले.

दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या मृतदेहासोबत काही निराधार महिलांची आधार कार्ड आढळून आली. दिंगबर गाडेकर हे निराधार महिलांसाठी काम करत असत. त्यामुळे पोलिसांनी आधार कार्डवरुन संबंधित महिलांशी संपर्क साधला. या महिलांकडून अधिक माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फीरवली. अखेर पोलिसांचा तपास गाडेकर यांची पत्नी आणि भाच्याजवळ येऊन थांबला. दरम्यान, गाडेकर यांची पत्नी अनिता आणि भाचा सोपान मोरे यांनी पोबारा केल्याची माहिती पुढे आली. तसेच, दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचेही पोलिसांना कळले.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेहाच्या शरीराचा दुसरा भागही शोधला होता. मृतदेहाच्या शरीराचे दोन्ही तुकडे पोलिसांनी आंबाजोगाई येथीर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. या वेळी दिगंबर गाडेकर यांची हत्या झाल्याचे पुढे आले. पोलिसांनी संशयावरुन पत्नी अनिता आणि सोपान मोरे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी करताच दोघांनीही आपल्या कृत्याची कबुली दिली.