शिवसेना उपनेते, माजी मंत्री, आमदार अनिल राठोड यांचे आज (5 ऑगस्ट) सकाळी हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आल्याने सामान्यांसह राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी देखील त्यांच्यासाठी शोक संदेश दिली आहे. माजी मंत्री व 25 वर्ष अहमदनगर शहराचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे माजी आमदार अनिल भैय्या राठोड यांचे अकस्मित निधन धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे निर्मळ मनाचा चांगला मित्र गमावला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Anil Rathod Passes Away: शिवसेना उपनेते, माजी राज्यमंत्री अनिल राठोड यांचे निधन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक.
अनिल भैय्या राठोड यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना थोरात म्हणाले की, गरीब कुटुंबातून आलेले अनिल भैय्या राठोड कायम तळागाळातील लोकांच्या मदतीला धावून जात असत. गरिबांप्रती त्यांची असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क या बळावर सलग पंचवीस वर्ष अहमदनगर शहराचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केले. अनिल भैय्या हे सरळमार्गी होते. विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. सर्वसामान्य माणसांमध्ये अगदी सहजतेने ते वावरत असत. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसांशी जोडलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांच्या निधनाने अहमदनगर शहर तर पोरके झाले आहे. त्यासोबतच एक समृद्ध राजकीय आणि सामाजिक जीवन जगणारा मित्रही आम्ही गमावला आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून राठोड कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले.
माजी मंत्री व शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. अनिल भैय्या राठोड यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/GFJVRr8pT6
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 5, 2020
अनिल भैय्या राठोड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. अहमदनगरमध्ये त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. न्युमोनियावर उपचार सुरू असतानाच त्यांचा आज सकाळी हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.