अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून (Ahmednagar City Vidhan Sabha Constituency) सलग 25 वर्ष प्रतिनिधित्त्व करणार्या अनिल राठोड यांचे आज (5 ऑगस्ट) सकाळी निधन झाले आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनिल राठोड यांचा उपचारा दरम्यान हद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या शोक संदेशामध्ये -'माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड (Anil Rathod) यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना.' असे म्हटले आहे.
'अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला. काही दिवसांपूर्वीच मी अनिल भैया यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती, कोरोनातून हळूहळू त्यांच्या प्रकृतीला आराम मिळत असतांनाच अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. हा मोठा आघात आमच्या शिवसेना परिवारावर तर आहेच पण त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या नगर जिल्ह्यातल्या तमाम जनतेने सुद्धा त्यांचा आपला अनिल भैय्या गमावला आहे.' असे ट्वीट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ट्वीट
अनिल भैया गेले ही वाईट बातमी कळली आणि धक्काच बसला. शिवसेना ज्यांच्या रक्तात होती आणि प्रत्येक श्वास हा शिवसेनेसाठी होता तो अखेर काळाने निष्ठूरपणे थांबविला अशा भावपूर्ण शब्दांत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली श्रद्धांजली वाहिली. (१/३)
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 5, 2020
अनिल राठोड हे शिवसेने कडून अहमदनगर शहर मतदारसंघात 1990 ते 2014 असे सलग 5 टर्म आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेने 2009 साली त्यांची उपनेतेपदी निवड केली होती. शिवसेना-भाजप महायुती सरकारमध्ये त्यांना महसूल राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देखील दिली होती.