
पती आणि पत्नी यांच्या वादातून पतीने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात घरातील मिनी सिलेंडर (Mini Cylinder) मारला. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बदलापूरजवळ (Badlapur) वांगणी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पती पसार झाला होता. पतीला पकडण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. वांगणी आयनकॉम्प्लेक्स सोसायटीत राहणारे संजीव बिपीनपाल मेहरुल हे आपली पत्नी अन्नदेवी मेहरुल आणि मुलगा नामदेव यांच्या सोबत राहत होते. मात्र पती आणि पत्नी यांच्यात मतभेद असल्याने त्यांचं पटत नव्हतं. (हेही वाचा - Mantrik Rapes Woman: मांत्रिकाचा महिलेवर तीन वर्षे लैंगिक अत्याचार)
संजीव बिपीनपाल मेहरुल हे आपली पत्नी अन्नदेवी मेहरुल यांच्यात होणाऱ्या सततच्या वादामुळे मुलगा नामदेव गावी राहत होता. त्याला गावावरून आणण्याचा तगादा पतीने लावला होता. मात्र पत्नीचा याला विरोध होता. या कारणावरुन पती आणि पत्नी यांच्यात वाद झाले आणि याच वादातून पतीने टोकाचे पाऊल उचलत पत्नी अन्नदेवी हिच्या डोक्यात घरातील मिनी सिलेंडर मारला. यामध्ये पत्नी अन्नदेवीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पतीने घरातून पळ काढला होता. त्याच्यावर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलीस संजीव मेहरुल याचा शोध घेत होते.
दरम्यान संजीव मेहरुल हा दिल्लीहून पुन्हा वांगणीला परत येत असल्याची माहिती बदलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भोई यांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी माहितीनुसार सापळा रचून संजीव मेहरुल याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत, अशी महिती बदलापूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भोई यांनी दिली आहे.