
दैनंदिन जीवनातील समस्या दूर करण्याच्या नावाकाली एका मंत्रिकाने महिलेवर तब्बल तीन वर्षे बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुकेश दर्जी नामक 45 वर्षीय तांत्रिकाला अटक केली आहे. जीवनातील अडचणी आणि समस्यांनी त्रस्त असलेल्या पीडितेने आपले मन तिच्या एका मैत्रिणीकडे मोकळे केले. या वेळी तिच्या मैत्रिणीने तिला मांत्रिकाची वाट दाखवली. त्याच्याकडे जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिला. इतकेच नव्हे तर आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी होत्या. पण त्या मांत्रिकामुळेच दूर झाल्याचे सांगितले.
पीडितेने मैत्रिणीवर विश्वास ठेवला. मैत्रिणीनेही पीडितेला मांत्रिकाबाबत अनेक चुकीच्या गोष्टी सकारात्मक दृष्टीने सांगितल्या. इतक्या की, मात्रिक फार जालीम आहे. तो समस्या बऱ्या करतो असे सांगितले. पीडिता मांत्रिकाकडे गेली. त्याने तिला तुझ्या आयुष्यातील समस्या दूर होतील. परंतू, त्यासाठी पूजा करावी लागेल. गरज पडल्यास आपल्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील असेही त्याने सांगितले. समस्यांचे निराकरण होणार म्हणून पीडितेने या सर्व गोष्टींना संमती दर्शवली. (हेही वाचा, Online Sex Racket नवी मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त, चार मुलींची सुटका)
धक्कादायक म्हणजे पीडिता पाठिमागचे तीन ते चार वर्षे तांत्रिकाच्या सल्ल्याने वागत होती. तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. ती मुकाटपणे सहन करत होती. मात्र, वारंवार वर्षानुवर्षे अत्याचार करुनही परिस्थितीत काहीच बदल होत नव्हता. त्यामुळे पीडितेला संशय आला. तिने थेट भाईंदर पोलीस स्टेशन गाठले आणि तांत्रिकाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत तांत्रिकाला अटक केली. त्याच्याविरोधात अघोरी व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
जादूटोणा, तंत्रमंत्र वगैरेंनी आयुष्यात काहीही फरक पडत नाही, असे विज्ञानाने वारंवार दाखवून दिले आहे. समाजात नरेंद्र दाभोलकर, शाम मानव यांच्यासारख्या अनेकांनी आपले आयुष्य जनजागृतीसाठी खर्ची घातले. असे असतानाही लोक मांत्रिक-तांत्रिकांच्या कच्छपी लागतात हे विशेष. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी सरकारने कठोर पावले टाकावीत, अशी भावना पुरोगामी विचारवंत व्यक्त करतात.