औरंगाबाद: कौटुंबिक वादातून महिलेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या
Representational Image (Photo Credits: ANI)

कौटुंबिक कलहातून एक धक्कादायक घटना औरंगाबादेत (Aurangabad) घडली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादजवळील गेवराई तांडा परिसरात ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त दिले आहे. या महिलेने दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली रविंद्र थोरात असे मृत महिलेचे नाव आहे. ती 25 वर्षांची होती. तिने 4 वर्षांची अनुष्का आणि 2 वर्षे आयुषसह विहिरीत उडी घेतली. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.हेदेखील वाचा- धक्कादायक! भावोजींच्या प्रेमात असलेल्या मेव्हणीने आपल्याच पतीचे अपहरण करून केली निर्घृण हत्या, 8 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

दरम्यान नांदेड (Nanded) मधून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. कोविड-19 (Covid-19) संसर्गामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच पत्नीने 3 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात ही घटना घडली. या घटनेनंतर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शंकर गंदम असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे आंध्रप्रदेशातील आहे. व्यवसायानिमित्त ते लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये होती. दरम्यान, शंकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शंकर यांच्या मृत्यूची बातमी समजताच पत्नी पद्मा गंदम यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तीन वर्षांच्या मुलासोबत लोहा परिसरातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. मात्र गंदम दांपत्यांच्या मृत्यूमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहेत.