कोविन अॅप (Cowin App) हॅक करुन लसीचे डोस न घेतलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येत असल्याची घटना औरंगाबाद (Aurangabad) येथून समोर आली आहे. 28 ऑगस्ट रोजी आरेफ कॉलनी आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येत असलेल्या DKMM केंद्रावर हा प्रकार घडला. लस न घेताच ऑनलाईन नोंदणी करुन प्रमाणपत्र डाऊनलोड केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासनानं पोलिसांत धाव घेतली आहे. (केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून Fake CoWIN App बाबत अलर्ट जारी; फसव्या अॅपच्या जाळ्यात न अडकण्याचं आवाहन)
डीकेएमएम महाविद्यालयात शनिवारी लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात 55 टोकन वाटण्यात आले. लसीकरणासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आधी रजिस्टरमध्ये नोंदणी करुन त्यानंतर कोविन पोर्टलमध्ये नोंद घेतली जात होती. या सर्वांचं लसीकरण झाल्यानंतर डेटा ऑपरेटर शकील खान यांनी फेरतपासणीसाठी अॅप पाहिले असता तिथे 71 जणांच्या नोंदी दिसल्या.
खान यांनी तात्काळ या बाबतची माहिती वॉररुमच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख हेमंत राठोड यांना दिली. त्यांनी याबद्दल आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडेलचा आणि अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे यांनाही सांगितलं. त्यानंतर केंद्रावरील लसीकरण तात्काळ थांबवण्यात आलं. (धक्कादायक! Mumbai मध्ये खोट्या RT-PCR रिपोर्टचा काळाबाजार; सायबर कॅफेच्या ऑपरेटरला अटक)
महापालिकेचं लॉनइन आयडी वापरुन चक्क 16 जणांची एन्ट्री करण्यात आली असून त्यांचं सर्टिफिकेटही डाऊनलोड करण्यात आलं आहे. लस न घेताच ही प्रमाणपत्रं डाऊनलोड करण्यात आली आहेत. ही 16 जण दोन कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी संबंधित आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. अंबरीन यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. हॅकर्सचा शोध सुरु आहे. दरम्यान, महापालिकेचं लॉग इन आयडी केवळ मोजक्याच लोकांना ठाऊक असल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. संपूर्ण चौकशी प्रक्रीया पार पडेपर्यंत हे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.