Assembly Winter Session 2019: नागपुर येथे 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु; देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
महाराष्ट्र विधिमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

रविवारी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडल्यावर, हिवाळी अधिवेशनाची (Assembly Winter Session 2019) घोषणा करण्यात आली. सोमवार, 16 डिसेंबर 2019 पासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याबाबत घोषणा केली. 21 डिसेंबर पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. यंदाचे अधिवेशन नागपूर येथे भरणार आहे. आज रामराजे नाईक निंबाळकर व नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समिती बैठकीत अधिवेशन कामकाजावर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

याबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या सरकारवर उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, ‘विधानसभेचे हिवाळी अधिवेशन केवळ 6 दिवसांसाठी बोलविण्यात आले आहे. सरकार स्थापनेपासून पोर्टफोलिओ वाटप किंवा मंत्रालयाचा विस्तार झाला नाही. हे (सत्र) औपचारिकता म्हणून आयोजित केले जात आहे कारण याचे कोण उत्तरदायी आहे हेच समजत नाही.’ दरम्यान, अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. (हेही वाचा: ठाकरे सरकारने दिले राज्य खड्डेमुक्त करण्याचे आदेश; जागतिक बँकेकडून घेणार कर्ज)

राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल 97 आमदार हे प्रथमत:च निवडून आले आहेत, ज्यांच्यासाठी हे अधिवेशन खास असणार आहे. नागपूर करारानुसार, हिवाळी अधिवेशनात केवळ विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र फक्त सहा दिवसांत नक्की काय आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची याबाबत ठाकरे सरकारचा परीक्षा असणार आहे. अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.