मुंबईत (Mumbai) मंगळवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. ज्यामुळे मुंबईत अनेक भागात पाणी साचले आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी वाहतूक सेवाही ठप्प झाली आहे. यावरून विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) शिवसेनेवर (Shiv Sena) शाब्दिक हल्ला चढवला आहे. पावसामुळे मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला शिवसेना जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवसेनेचे मुंबई शहराकडे लक्ष नाही. त्यामुळे थोडासा पाऊस झाला तरी, मुंबई पाण्याखाली जाते. शिवसेनेनी केवळ वरवरची काम केली असून मुंबईकरांच्या मूळ प्रश्नांकडे बघायला त्यांना वेळ नाही, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
“मी यापूर्वीही बोललो होतो. पाऊस हा अचानक येतो का? पावसाळा संपल्यानंतर 7-8 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे असतो. मुंबईत कोणत्या भागात पाणी साचते, या ठिकाणांची नोंदही आहे. पैशांची आपल्याला कमी नाही. मुबंईसाठी पाहिजे ती मशिनरी आपण घेऊ शकतो. मुंबईकरांचे 50 हजार कोटी एफडीमध्ये आहेत आणि तरीही मुंबईकर जर प्रत्येक वर्षी पाण्यात जाणार असतील तर 30-40 वर्षे मुंबई महापालिकेत तुम्ही सत्ता उपभोगून काय केले? असा माझा शिवसेनेला प्रश्न आहे", असे दरेकर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
तसेच, भाजप नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी प्रविण दरेकर यांना विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले आहे. एकनाथ खडेस मोठे नेते असून त्यांच्याबाबत कोणतेही विधान करणे मला योग्य वाटत नाही, असेही प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
मुंबईमध्ये काल पडलेल्या पावसाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. मुंबई शहरातील एकूण पाऊस हा 286.4 मीमी इतका झाला आहे. हा पाऊस मागील 15 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील मोठा पाऊस आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत कुलाबामध्ये 147.8 मीमी तर सांताक्रुझ मध्ये 286.4 मीमी इतका नोंदवण्यात आला आहे.