Arun Gawli (Photo credits: Facebook)

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी जेल मध्ये असलेले कुख्यात गुंड अरूण गवळी (Arun Gawli) यांना पुन्हा पॅरोल मंजूर झाला आहे. अरूण गवळीने मुलाच्या लग्नासाठी मागितलेली 4 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली आहे. सध्या अरूण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur bench of Bombay High Court) अरूण गवळीचा पॅरोल मंजूर केला आहे.

रिपोर्ट्सनुसार अरूण गवळीचा मुलगा 17 नोव्हेंबर दिवशी मुंबई मध्ये विवाहबद्ध होणार आहे. यासाठी त्याच्याकडून रजेची मागणी करण्यात आली होती. अरूण गवळीचा 4 दिवसांची रजा मंजूर झाली आहे. दरम्यान या रजेमध्ये पोलिस सुरक्षेसह अरूण गवळीने मुंबईला जाणं आवश्यक असल्याचं कारागृह प्रशासनाने म्हटलं आहे. त्याचा खर्च देखील अरूण गवळीला करावा लागणार असल्याचं नमूद केले आहे.

दरम्यान अरूण गवळीने नागपूर खंडपीठात फौजदारी याचिका दाखल करीत विना सुरक्षा 8 दिवसांची रजा मिळावा म्हणून न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने यामध्ये 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर चार दिवसांची रजा मंजूर केली आहे. यापूर्वी देखील अरूण गवळी मुलीचं लग्न, बायकोचं आजारपण या कारणांवरून पॅरोलवर बाहेर आला आहे. 12 वेळेस विविध कारणांसाठी यापूर्वी पॅरोल घेतला असून पुन्हा वेळेत जेल मध्ये परतल्याचं अरूण गवळीने सांगितलं आहे.

अरूण गवळीवर 2 मार्च 2007 ला असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर या शिवसैनिकाची हत्या केल्याचा गुन्हा आहे. यामध्ये 2008 ला अरूण गवळीला अटक झाली आणि 2012 मध्ये विशेष न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. त्यानंतर अरूण गवळी तुरूंगात शिक्षा भोगत आहे.