‘रिपब्लिक टीव्ही’ (Republic TV) चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विविध नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेला राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुनच अन्वय नाईक प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापाठीमागे कोणताही आकस नाही. परंतू, भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते आज असा काही गळा काढून रडत आहेत की, जसे काय तो भाजपचा कार्यकर्ताच आहे. भारतीय जनता पक्षाचा पोपट पिंजऱ्यात गेला आहे म्हणून भाजप इतका गळा काढत आहे का? असा सवालही परब यांनी उपस्थित केला आहे.
अर्नब गोस्वामी याला केलेली अटक ही कोणत्याही प्रकारे प्रसारमाध्यमं किंवा वृत्तपत्रांची गळचेपी नाही. प्रसारमाध्यमांच्या गळचेपीचा या प्रकरणात काहीच संबध नाही, असे अनिल परब यांनी या वेळी म्हणाले. पुढे बोलताना ज्या मराठी बाईचे कुंकू पुसलं, ज्याच्या पतीचे निधन झाले त्या महिलेचा जर काही आरोप असेल. न्यायालयाचे आदेश असतील तर त्याची दखल घेऊन महाराष्ट्र पोलिसांनी काही कारवाई केली तर, त्यात गैर काय? असा सवालही अनिल परब यांनी या वेळी उपस्थित केला.
ज्या लोकांवर आरोप आहे त्या लोकांना भाजप पाठीशी का घालतं आहे? अर्नब गोस्वामी यांना अटक झाली याचा अर्थ ते गुन्हेगार आहेत असा नाही. त्यांना केवळ तपाससाठी, चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. चौकशी करण्यात, गैर काय आहे? पण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर भाजपला इतके वाईट का वाटत आहे, असा सवालही अनिल परब यांनी या वेळी विचारला. (हेही वाचा, Arnab Goswami in Maharashtra Police Custody: अर्नब गोस्वामी अटक प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया)
अर्नब गोस्वामी याच्यामुळे जर एका मराठी उद्योजकाला आत्महत्या करावी लागली असेल. मराठी महिलेचे कुंकू पुसले गेले असेल, तिला विधवा व्हावे लागले असेल तर त्याचा तपास व्हायलाच हवा. अर्नब याच्यासोबतच इतर दोघांनाही अटक झाली आहे. परंतू, त्यांच्यासाठी हे भाजपवाले गळा काढत नाहीत. त्यामुळे केवळ भाजपचा पोपट पिंजऱ्यात गेला आहे, म्हणूनच भाजप गळा काढते आहे का? असा सवाल परब यांनी या वेळी विचारला आहे.