Anna Hazare  यांनी शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात उपोषण करण्याचा दिला इशारा
Anna Hazare | (Photo Credits: You Tube)

मागील महिन्याभरापासून शेतकरी केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात (Farm Law) आक्रमक झाले आहेत. दिल्लीमध्ये सिंधू बॉर्डरवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. अशामध्ये आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) देखील शेतकर्‍यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये जानेवारी 2021 च्या शेवटच्या आठवड्यात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे पत्र पाठवले आहे.

दरम्यान दिल्लीमधील थंडीचा कडाका, कोरोना परिस्थिती आणि अण्णांचे वय पाहता त्यांच्या उपोषणाची परवानगी मिळणं कठीण आहे. परंतू जंतरमंतर किंवा रामलीला वर परवानगी न मिळाल्यास अटक करवून घेत तुरूंगामध्ये उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. Anna Hazare Wrote to Narendra Singh Tomar: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग करण्यासंदर्भात अण्णा हजारे यांचे नरेंद्र सिंह तोमर यांना पत्र.

अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र पाठवून उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते आमदार हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णांची भेट घेतली आहे. त्यानंतर संकटमोचक समजल्या जाणार्‍या माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन अण्णा हजारेंना प्रकृतीच्या कारणास्तव आपण उपोषण न करण्याचा विचार करावा अशी विनंती केली. मात्र केंद्र सरकारला पुरेसा वेळ देऊन देखील सरकारकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने अण्णा हजारे आंदोलनावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.