Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देशमुखांचे पीए संजीव पालांडे (Sanjeev Palande) आणि कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना अटक करण्यात आली आहे. काल या दोघांना सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आज सकाळी अकरा वाजता त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाईल. दरम्यान, ईडीने (ED) काल अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील निवासस्थानी छापेमारी केली होती.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी वसुलींच्या आरोपानंतर ईडीकडून देशमुखांची चौकशी सुरु होती. त्यानंतर काल त्यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली. (Money Laundering Case: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या नागपूरच्या घरी ED ची छापेमारी)

ईडीच्या छापेमारी नंतर प्रतिक्रीया देताना अनिल देशमुख म्हणाले की, "मी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करेन. परमबीर सिंह यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांना मुंबई पोलिस आयुक्त पद सोडावे लागले. त्यांनी पदावर असताना माझ्यावर आरोप का नाही केले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला."

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधक हे सर्व सुडापोटी करत असल्याचे म्हटले आहे. देशमुखांवर होत असलेली ईडीची छापेमारी नवीन नाही. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. यापूर्वीही या यंत्रणांनी देशमुख यांच्या कुटुंबियांना त्रास दिला होता. आणखी त्रास देता येईल का यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं शरद पवार म्हणाले होते. तर राजकीय सुडापोटी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.