महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या नागपूर (Nagpur) मधील निवासस्थानी आज ईडीने (ED) छापेमारी केली. याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे. "ईडी सारख्या यंत्रणांचा होत असलेला वापर अत्यंत दुर्दैवी असून राजकीय सुडातून हे केले जात आहे," असं सुप्रिया सुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या. (Money Laundering Case: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या नागपूरच्या घरी ED ची छापेमारी)
"केंद्र सरकार आणि राज्यात विरोधी पक्ष ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात आणि देशात असं मी कधीच पाहिलेलं नाही. अशी टोकाची भूमिका देशात केवळ आणीबाणीच्या काळात असल्याचं मी ऐकलं होतं. पण एजन्सीचा गैरवापर मी पहिल्यांदाच पाहत आहे. राजकीय कारणांसाठी एजन्सीचा वापर करणे अत्यंत धक्कादायक आहे. दुर्दैवी आहे आणि भारताला न शोभण्यासारखं आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या की, "राजकीय सुडातून या सर्व गोष्टी घडत आहेत. हे सर्व महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं असून राज्यात हे प्रथमच होत आहे. शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारी, लसींचा तुटवडा यांसारखे सर्व महत्त्वाचे आणि संवेदनशील विषय, जनतेच्या हिताचे निर्णय आणि पक्षाची विचारसरणी बाजूला ठेवून केवळ राजकीय सूडातून या गोष्टी केल्या जात आहेत." तसंच वैयक्तिक आणि खालच्या पातळीचं राजकारण केलं जात असल्याचंही त्या म्हणाल्या.
एजन्सीचा वापर करुन खोट्यानाट्या गोष्टी करणं यातून त्यांना देशाची आणि राज्यातील जनतेची फिकीर नसल्याचं दिसून येतं. तसंच हे सर्व राजकीय द्वेष्यातून घडवून आणल्याचेही दिसून येत आहे. मात्र यांच्या दडपशाहीला आम्ही घाबरणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू. काही केलं नसताना सत्तेचा गैरवापर होतो तेव्हा मराठी माणून नेहमीच खंबीरपणे उभा राहिला आहे. तो मोडले पण कधीही वाकणार नाही, याचीही आठवण सुप्रिया सुळे यांनी यावेळी करुन दिली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम खूप चांगलं चालल्याने आमच्यावर टीका करण्याचं विरोधकांचं कर्तव्य आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार पाच वर्षचं नाही तर सातत्याने 25 वर्ष जनतेची सेवा करेल आणि विरोधकांनी आमच्यावर मनमोकळेपणाने टीका करत राहावी, असंही त्या म्हणाल्या.