Anil Deshmukh: अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे ED च्या ताब्यात
Anil Deshmukh | (Photo Credits- Twitter)

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) म्हणजेच ईडी (ED) च्या रडारवर आहेत. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीद्वारे छापेमारी सुरु आहे. देशमुख यांच्या नागपूर येथील निवास्थानासोबतच मुंबई येथील 'सुखदा' या निवास्थानावरही ईडीचे एक पथक सकाळपासून डेरा टाकून आहे. अनिल देशमुख हे देखील सुखदा निवास्थानी दाखल झाल्याची माहिती आहे. दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे (Sanjeev Palande) यांना ताब्यात घेतले आहे. पालांडे यांना घेऊन अधिकारी ईडीच्या कार्यालयात गेले आहेत. पालांडे यांची चौकशी करुन सोडण्यात येणार की त्यांना अटक होणार याबाबत अद्याप काही समजू शकले नाही.

दरम्यान, इडीच्या अधिकाऱ्यांकडून देशमुख यांच्या कुटींबातील सदस्यांचे फोनही तपासले जात असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. अनिल देशमुख यांचे नागपूर येथे ज्ञानेश्वरी आणि मुंबई येथे सुखदा अशी निवास्थाने आहेत. दोन्ही निवासस्थानांवर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. देशमुख यांचे खासगी सचीव पालांडे यांच्या चौकशीतून ईडीला काय गवसते याबाबत उत्सुकता आहे. अनिल देशमुक यांच्यावर झालेल्या आरोप प्रकरणी ईडीने काही बारमालकांसह इतरही काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत. यात डीसीपी राजीव भुजबळ आणि काही बार मालकांचा समावश असल्याचे समजते. (हेही वाचा, Anil Deshmukh Case: राजकीय सुडापोटी यंत्रणांचा गैरवापर; सुप्रिया सुळे यांची भाजपवर जोरदार टीका)

अनिल देशमुख यांच्या निवासांवर ईडीची छापेमारी सुरु असली तही काही दिवासंपूर्वीच सीबीआयनेही देशमुख यांच्या घरावर छापेमारी केली होती. सीबीआयने 21 एप्रिल रोजी देशमुख यांच्या घर आणि कार्यालयांसह इतर 10 ठिकाणी ठापे टाकले होते. यात मुंबई येथील ज्ञानेश्वरी निवासस्थानावरी इडिने छापे टाकल्याची माहिती सूत्रांनी त्या वेळी दिली होती. याशिवाय सीबीआयने ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही नेल्याची माहिती होती. (Money Laundering Case: माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या नागपूरच्या घरी ED ची छापेमारी)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानी जिलेटीनच्या कांड्या भरलेले वाहन उभा करणे, त्याच प्रकरणात पुढे मनसुख हिरेन यांची हत्या होणे, त्याचे धागेदोरे सचिन वाझे यांच्यापर्यंत पोहोचणे आणि पुढे याच प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली होणे असा घटनाक्रम घडला. या घटनाक्रमानंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. याबाबत तक्रारही दाखल झाली. त्यानंतर या प्रकणाला वेगळे वळण मिळाले. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत सुरु झाली आहे.