Uddhav Thackeray, Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई मध्ये अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीकरिता (Andheri Vidhansabha By Poll) शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला नव्या नावासह आणि पक्षचिन्हासह निवडणूकीला सामोरं जावं लागणार आहे. ठाकरे गटाकडून काल मशाल, त्रिशूळ आणि उगवता सूर्य अशा तीन चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. तर शिंदे गट आज तलवार, गदा आणि तुतारी या चिन्हांचा विचार करत असल्याची चर्चा आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत त्यांच्याकडून यादी दिली जाणार आहे तर गटाच्या नावामध्येही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाचा समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज दोन्ही गटाकडून पर्याय सादर केल्यानंतर कोणाला कोणते चिन्हं आणि नाव मिळणार याचा फैसला निवडणूक आयोग करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल फेसबूक लाईव्ह करत चिन्ह आणि नावांचे तीन पर्याय जाहीर केले आहेत. यावेळी शिंदेंवर हल्लाबोल करताना हिंमत असेल तर बाळासाहेब ठाकरेंचं नाव न वापरता निवडणूकीच्या मैदानात उतरा असं आव्हानही त्यांनी दिलं आहे. तर शिवसेनेची ओळख असलेल्या 'धनुष्यबाण' याला गोठवल्यानंतर ते आमदार- खासदारांच्या बैठकीत भावूक झाल्याचं काल भास्कर जाधव म्हणाले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 3 चिन्हांच्या पर्यायांची केंद्रीय निवडणूक आयोगाच्या यादीत समावेश नाही त्यामुळे अपवादात्मक स्थितीत उद्धव ठाकरेंच्या पर्यायातून त्यांना चिन्ह मिळणार का? याची देखील उत्सुकता आहे. Uddhav Thackeray Speech: चाळीस डोक्याच्या रावणाने भगवान श्री रामाचे धनुष्य बाण तोडले, उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र .

शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्याझटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पहिल्यांदाच शिंदे-उद्धव ठाकरे गट निवडणूकीच्या रिंगणात आमने सामने येणार आहेत. त्यामुळे सध्या सत्तांतराचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अंधेरीची पोटनिवडणूक दोन्ही गटासाठी प्रतिष्ठेची असणार आहे.