Andheri By-Polls: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत Congress ने दिला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील Shiv Sena ला पाठींबा 
Nana Patole | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील काँग्रेसने (Maharashtra Congress) बुधवारी मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही निवडणूक घेण्यात येत आहे. शिवसेनेने रिंगणात उतरवलेल्या मृत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी रुतुजा लटके यांना आपला पक्ष पाठिंबा देईल, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांना सांगितले.

दोन वेळा आमदार राहिलेले रमेश लटके यांनी 2014 मध्ये काँग्रेसच्या सुरेश शेट्टी यांचा या मतदारसंघातून पराभव करून विधानसभेत प्रवेश केला होता. या वर्षी 11 मे रोजी दुबईच्या दौऱ्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांच्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्याची योजना पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. (हेही वाचा: Andheri By Election: आता थेट भाजप विरुध्द शिवसेना! निवडणूक रिंगणात कोण मारणार बाजी?)

याबाबत बोलताना पटोले म्हणाले, ‘2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी (MVA) स्थापन करण्यात आली. महाराष्ट्राच्या हितासाठी ‘जातीयवादी’ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही युती झाली. एमव्हीए आघाडी सरकारने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. मात्र भाजपने सरकार पाडण्यासाठी ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर केला, परंतु एमव्हीए तोडण्याचे त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.’

पटोले यांनी सांगितले की, भाजपविरोधातील लढाईत काँग्रेस अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा करणार नाही. शिवसेनेचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी ते पूर्ण ताकदीने काम करतील. शहर काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, शिवसेनेने पुढील वेळी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा द्यावा. जूनमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील ही पहिलीच निवडणूक असेल. 3 ऑक्टोबर 2022 पासून अंधेरी (पूर्व) या विधानसभा क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीकरिता मतदान गुरूवार, दिनांक 3 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे.