Devendra Fadnavis, Aditya Thackeray, Amruta Fadnavis (Photo Credits: IANS and facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या. तसेच जास्त जागा जिंकूनही सत्तेत न आल्याने आणि विरोधी पक्षात बसल्याने भाजपानेही सरकारवर टिका करण्यास सुरुवात केली. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेने बांगड्या घातल्या असतील आम्ही नाही असे फडणवीसांनी म्हटले होते. त्यावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी टीका करत ''असे बोलणे माजी मुख्यमंत्र्यांना शोभत नाही'' असे ट्विट केले होते. त्या ट्विटला देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

"ज्यांना सर्व आयतं मिळालं आहे, त्यांना संघर्षाची किंमत कळणार नाही." असे शब्दांत त्यांनी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

पाहा अमृता फडणवीसांचे ट्विट:

हेदेखील वाचा- कर्जमाफी झाली आता लग्नाला या...! शेतकऱ्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण

आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत "रेशमी किड्याला आयुष्यातील 'उपहास' कधीच समजणार नाही, पूर्वजांनी विणलेल्या सुखासीन 'रेशमी' आयुष्याचा उपभोग ते घेतच त्यांची भरभराट होते," असे अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर टिका करत महिला या सर्वात शक्तिशाली असून त्या बांगड्या परिधान करतात. राजकारण हे चालतच राहते, पण मानसिकता बदलायला हवी, असे आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खडे बोल सुनावले होते. तसेच या विधानाबाबत माफी मागण्याचे आवाहन ही केले होते.